बीड जिल्हा जसा भाजपचा बालेकिल्ला तसाच राष्ट्रवादीचा ही बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. म्हणूनच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे बीड जिल्ह्याकडे बारीक लक्ष असते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात बीड जिल्ह्याकडे येणारी राष्ट्रवादीची एक्सप्रेस रोखण्यासाठी पंकजा मुंडे तयारीनिशी मैदानात उतरल्या आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. बीड जिल्ह्याचे राजकीय मैदान तर जणू युद्धभूमी झाली आहे. लोकसभा लढवण्यासाठी भाजपाने आपला उमेदवार ही घोषित केला आहे तर राष्ट्रवादीचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे, हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीसाठीची आहे. भाजपाला बीडमध्येच थोपवण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. चार दिवसानंतर राष्ट्रवादीचे मेळावे बीड जिल्ह्यात होणार आहे. बीड जिल्ह्यात आपली ताकद दाखवण्यासाठी राष्ट्रवादी सध्या सुसाट आहे तर सुसाट राष्ट्रवादीची एक्सप्रेस रोखण्यासाठी पंकजा मुंडे तयारीला लागल्या आहेत. विकास कामाच्या शुभारंभाचा धडाका सुरू केला आहे. परळी मतदार संघात मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. परळीसह माजलगाव, गेवराई, आष्टी-पाटोदा या मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विकास कामावर जोर दिला जात आहे. बीड जिल्ह्याच्या आत्मीयतेचा विषय असणाऱ्या रेल्वेच्या कामाकडे पंकजा मुंडे लक्ष ठेऊन आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पंकजा मुंडे राजकीय समीकरणे आखत आहेत. सर्वात फायदेशीर मतदार संघ असणाऱ्या आष्टी पाटोदा मतदार संघात तर दोन्ही आमदार सध्या पंकजा मुंडे सोबत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच पश्चिम महाराष्ट्रातून येणारे राष्ट्रवादीचे आक्रमण थोपवण्यासाठी पंकजा मुंडे आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे यांच्या मदतीने तयारीला लागल्या आहेत.


No comments:
Post a Comment